मुख्याधिकाऱ्यांचा थेट इशारा!
कणकवली : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर कणकवली नगरपंचायत प्रशासन गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरले. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी करत विक्रेत्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या हद्दीबाहेर आलेले स्टॉल व साहित्य हटविण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या. यावेळी काही विक्रेत्यांनी थेट रस्त्यापर्यंत दुकाने वाढविल्याचे निदर्शनास आले. यावर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पाहत अनेकांनी स्वतःहून आपली दुकाने व साहित्य मागे घेतले.
त्यानंतर नगरपंचायतीचे पथक मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पोहोचले. येथे काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात जागा अडवून ठेवल्याचे आढळून आले. एका व्यक्तीने चार दुकाने होतील एवढा भाग व्यापल्याचे निदर्शनास येताच मुख्याधिकारी पाटील यांनी थेट कारवाईची भूमिका घेत काही अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. यावेळी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आपले स्टॉल व साहित्य हटविले.
कारवाई दरम्यान भाजी विक्रेते संघटनेचे अनिल हळदिवे आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच कारवाई करावी, अशी भूमिका हळदिवे यांनी मांडली. मात्र अतिक्रमणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची कानउघाडणी केली.
याचवेळी उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात फुलांचे स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांनाही मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी खडेबोल सुनावले. आज सूचना देत आहोत; मात्र पुढील वेळी थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दुपारच्या सत्रात बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाखालील शेडची पाहणी करण्यात आली. गणपती पूजनासाठी उपलब्ध करून दिलेली जागा अन्य व्यावसायिक कारणांसाठी वापरली जात असल्याचे आढळून आले. याबाबत रिक्षाचालक-मालक संघटना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळा वराडकर यांना मुख्याधिकाऱ्यांनी जाब विचारला. जागा नेमकी कशासाठी देण्यात आली ? तिचे भाडे किती आहे ? आणि ती अधिकृतपणे वापरली जाते का ? याबाबत प्रशासनाने विचारणा केली. तसेच संबंधित प्रकार तात्काळ बंद करून जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले.
उड्डाणपुलाखालील काही हॉटेल व स्टॉलधारकांकडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गुरुवारी झालेल्या या मोहिमेमुळे शहरातील अतिक्रमण धारकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून आगामी दिवसांत नगरपंचायतीची अतिक्रमण हटाव मोहीम किती प्रभावी ठरते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या कारवाईत मुख्याधिकारी गौरी पाटील, ध्वजा उचले, विभव करंदीकर, प्रशांत राणे, रवी महाडेश्वर, प्रदीप गायकवाड, मनोज तोरस्कर, मनोज धुमाळे, अमोल अघम, सचिन नेरकर, सत्यवान राणे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी या अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले होते.














