किल्ले राजकोट येथे लाईट अँड साउंड शो उभारणी होणार
भाजपा विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील किल्ले राजकोट येथे साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक भव्यदिव्य आहे. याठिकाणी छत्रपतींच्या इतिहासाची माहिती देणारा लेजर लाईट व साउंड शो निर्माण करण्यासाठी आपल्या विधनपरिषद आमदारकीचा पाहिला एक कोटी निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करणार करणार आहे. अशी माहिती भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी किल्ले राजकोट येथे बोलताना दिली.
भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मालवण नगरपालिकेचे भाजपचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी राजकोट किल्ल्यावरील शिव स्मारकाच्या ठिकाणी लेझर लाईट व साउंड शो निर्माण करण्याची संकल्पना मांडत याबाबत आमदार प्रमोद जठार यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी आमदार प्रमोद जठार यांनी राजकोट किल्ला येथे भेट देऊन शिवरायांच्या स्मारकाच्या चरणी नतमस्तक होत परिसराची पाहणी केली. यावेळी राजकोट येथील नागरिक यांच्या वतीने बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर वं सहकारी यांनी आम. जठार यांचे स्वागत करून सत्कार केला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, विलास हडकर, किल्ले अभ्यासक डॉ. ज्योती तोरसकर, नगरसेवक रविकिरण तोरसकर, मंदार केणी, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, पं. स. सदस्या योजना कांबळी, महेश मांजरेकर, पंकज सादये, अजिंक्य पाताडे, सन्मेष परब, सौ. सेजल परब, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, बबलू सावंत, भाऊ सामंत, शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम, राजू परुळेकर, दिपक सुर्वे, देवेंद्र हडकर, विजय निकम, दाजी सावजी, अमृता फाटक, बंडू गावडे, आशिष हडकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रमोद जठार म्हणाले, आपल्या आमदार फंडाचा निधी महाराजांच्या चरणाशी अर्पण करावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. हा निधी कशाप्रकारे वापरला जावा याबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर राजकोट येथे सायंकाळच्या वेळात लेजर लाईट व साउंड शो होण्यासाठी निधी देण्यात यावा असे ठरले. लेझर लाईट शो मुळे येथे पर्यटकांची संख्या वाढेल.
राजकोट येथे उभारण्यात आलेले महाराजांचे स्मारक हे सुंदर आहे. कोकणात रायगड पासून सिंधुदुर्ग पर्यंत एक पर्यटनाची एक साखळी निर्माण करण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. संगमेश्वर कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे ‘त्यागाचे सर्वोच्च प्रतिक’ या स्मारकाच्या उभारणीस सुरुवात करण्यात आली आहे. तर राजापूरला ब्रिटिशांची जी वखार आहे, जो किल्ला आहे त्याला सुशोभीत करण्याचे काम पुर्ण झाले आहे. विजयदुर्गला याठिकाणी आरमाराचे म्युझियम व हेलियम वायूचा शोध लावला त्याच एक म्युझियम होणार आहे. अशाप्रकारे रायगड- संगमेश्वर- राजापूर विजयदुर्ग आणि मालवण अशाप्रकारे एका साखळीत पर्यटकांना इतिहास अनुभवता येणार आहे, असेही आम. जठार म्हणाले.
महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे हिच भावना
लेजर लाईट शोमध्ये महाराजांचा पराक्रमी असा इतिहास दाखविण्यात येणार असून यासाठी ईतिहास अभ्यासक डॉ. ज्योती तोरसकर त्याविषयी स्क्रिप्ट तयार करण्याचे काम करत आहेत. हा शो दहा ते पंधरा मिनीटांचा करण्यात येणार असून दर एक तासाने हा शो लावण्यात येणार आहे. देश विदेशातील पर्यटक याठिकाणी यावेत आणि महाराजांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे हिच भावना माझी आहे.
एक कोटी निधी
येत्या २२ तारीखला अधिवेशन असून त्या अधिवेशनात परवानगी घेऊन १ कोटीचा पहिला निधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लेझर लाईट शो साठी आपण देणार आहोत. तसेच राजकोट येथून दिसणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदीवरही येत्या काळात अशाप्रकारे लाईट शो होऊ शकतो, असेही आम. जठार म्हणाले.














