मांगेली रस्ते कामावरून संजय सातार्डेकर संतप्त
कृषी विभागाचा मनमानी कारभार खपवून घेणार नाही: उपसभापती गणेशप्रसाद गवस
वीज वितरणाच्या भोंगळ कारभारावर स्नेहा गवस आक्रमक
दोडामार्ग:प्रतिनिधी
मांगेली येथील रस्त्याचे निकृष्ट व अपूर्ण काम, मोऱ्या बांधण्यापूर्वीच घाईघाईने उरकलेले रस्त्याचे काम, आणि तालुक्यातील कृषी विभागाचा मनमानी कारभार यांमुळे दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा प्रचंड तापली. लोकप्रतिनिधींनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत, पावसाळ्यापूर्वी सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सभा येथील स्वामी विवेकानंद सभागृहात सभापती पार्वती गवस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सोनिया कुबल, सायली निंबाळकर, उपगटविकास अधिकारी यशवंत गवस आणि सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सातार्डेकरांचा संतप्त सवाल
मांगेली येथे सुरू असलेल्या रस्ता कामावर सदस्य संजय सातार्डेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “मोऱ्यांचे (पूल/नाल्यांचे) काम करण्यापूर्वी रस्त्याचे काम कसे काय करण्यात आले? ठेकेदाराला पाठीशी घालू नका. आता रस्ता फोडून मोऱ्यांचे काम करणार का?” असा संतप्त सवाल सातार्डेकर यांनी उपस्थित केला. तसेच, तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत फार्म हाऊस सुरू असून त्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही अन्य सदस्यांनी केली.
तालुक्यातील कृषी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘आत्मा’ समितीच्या बैठकीवरून उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. इतर तालुक्यांत बैठका होऊन बातम्या प्रसिद्ध झाल्या असताना, येथील अधिकारी टाळाटाळ करत असल्याबद्दल गवस यांनी जाब विचारला.
”कृषी विभागाची मनमानी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कोणतीही बैठक घ्यायची असल्यास लोकप्रतिनिधींना लेखी निमंत्रण द्या, मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज पाठवून चालणार नाही. सर्वच जण नेहमी मोबाईल पाहत नाहीत. पावसाळा तोंडावर आला असताना कार्यालयात पडून असलेले बियाणे शेतकऱ्यांना कधी वाटणार?”
असा प्रश्न गणेशप्रसाद गवस उपसभापतीयांनी केला
सभेत वीज वितरणाचा विषय निघताच सदस्य स्नेहा गवस अत्यंत आक्रमक झाल्या. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही अद्याप विद्युत वाहक तारांवरील झाडी छाटण्यात आलेली नाही. भर पावसाळ्यात जनतेला याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. महावितरणचे लाईनमन कधीच फोन उचलत नाहीत. वीज वितरणाचा हा भोंगळ कारभार आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केला.
तालुक्यातील मराठी शाळा काही दिवसांत सुरू होणार आहेत. परंतु, दुरुस्ती मंजूर असलेल्या अनेक शाळांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. संबंधित ठेकेदारांना तात्काळ पत्र काढून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी एकमुखी मागणी सर्व सदस्यांनी केली.
तिलारी नदीच्या पुरामुळे तालुक्यातील अनेक गावांना फटका बसतो, याकडे उपसभापतींनी लक्ष वेधले. नदीकाठच्या गावांमध्ये बसवलेले पूर-इशारा सायरन तात्काळ कार्यान्वित करा. तसेच, पावसाळ्यात नदीकाठी अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानीच्या घटना घडतात. अशा धोकादायक ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतींमार्फत तातडीने इशारा फलक (धोक्याचे फलक) लावून दुर्घटना टाळाव्यात, अशा स्पष्ट सूचना उपसभापतींनी प्रशासनाला दिल्या.












