फार्मर कप स्पर्धेसाठी ‘सुनंदा शेतकरी गट असगणी’ची जय्यत तयारी!     

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :

सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंर्तगत आयोजित ‘फार्मर कप’ स्पर्धेत यश मिळवण्यासाठी मालवण तालुक्यातील असगणी येथील ‘सुनंदा शेतकरी गट’ पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गटातील शेतकऱ्यांसाठी विविध कृषी प्रत्यक्षिके आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गटातील सदस्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके (डेमो) दाखवण्यात आली. यावेळी कीड नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी असलेल्या दशपर्णी अर्काची निर्मिती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

पेरणीपूर्वी पिकाची उगवणक्षमता कशी तपासावी आणि बीजप्रक्रिया कशी करावी, याचे तंत्र शेतकऱ्यांनी समजून घेतले.आणि माती परीक्षणासाठी शेतातील मातीचा नमुना अचूक पद्धतीने कसा घ्यावा, याचे थेट सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले:

डॉ. विलास सावंत (शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस) यानी नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत, शेतीमध्ये लागणाऱ्या विविध जैविक आणि नैसर्गिक निविष्ठा घरच्या घरी कमी खर्चात कश्या तयार कराव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. दशरथ सावंत (मंडळ कृषी अधिकारी, पोईप) यानी आगामी ‘फार्मर कप’ स्पर्धेचे नियम, त्याचे स्वरूप आणि या स्पर्धेत गट म्हणून कशा प्रकारे अव्वल स्थान मिळवता येईल, याविषयी सविस्तर आराखडा मांडला. पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण म्हणाले, आजच्या काळात तुकड्या-तुकड्यांच्या शेतीपेक्षा सामूहिक शेती काळाची गरज आहे,असे सांगत त्यांनी सामूहिक शेतीचे फायदे आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी उपसरपंच श्री. देवेंद्र पुजारे, माजी सरपंच श्री. वैभव पारकर यांच्यासह गावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘सुनंदा शेतकरी गटा’च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. गटाचा हा उत्साह पाहता असगणी गाव फार्मर कप स्पर्धेत नक्कीच मोठी भरारी मारेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.