आंबोली घाटात कारला धडक देत पलायन केलेला ट्रक चालक झाराप झिरो पॉईंटवर ताब्यात

सावंतवाडी पोलिसात गुन्हा दाखल 

​सावंतवाडी : हैदराबादहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने आंबोली घाटात कारला जोरदार धडक देऊन अपघात घडवल्याची खळबळजनक घटना घडली. अपघात करून घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाराप झिरो पॉईंट येथे शिताफीने ताब्यात घेतले. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

​ ​ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते कुडाळ असा प्रवास करणारा कंटेनर (क्रमांक TG 07 E 4751) आंबोली घाटातून जात होता. घाटातील केसरी गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आंबोलीच्या बाजूला असलेल्या एका तीव्र वळणावर, कंटेनर चालक परमेश्वर वर्मा याने आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगात व धोकादायक रित्या चालवले.

​याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या सियाझ कारला (क्रमांक MH 03 CB 8619) या कंटेनरने जोरदार ठोकर दिली. ही धडक एवढी तीव्र होती की, यात कारचे मोठे नुकसान झाले. याशिवाय, कंटेनरने तेथून जवळच असलेल्या एका टाटा पंच गाडीच्या उजव्या बाजूच्या आरशालाही (Mirror) घासून धडक दिली.

​ ​अपघात घडवल्यानंतर कंटेनर चालक परमेश्वर वर्मा हा मदतीसाठी घटनास्थळी न थांबता, थेट कुडाळच्या दिशेने कंटेनर घेऊन पळून गेला. हा प्रकार पाहून दोन दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला आणि बुरडी पुलाजवळ त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथे काही काळ कंटेनर थांबला खरा, मात्र चालक खाली न उतरता त्याने दुचाकीस्वारांना हुलकावणी दिली आणि पुन्हा तिथून पळ काढला.

​झारा झिरो पॉईंट येथे आवळल्या आवळल्या आवळल्या मुसक्या

​दुचाकीस्वारांनी तात्काळ याबाबत पुढे कल्पना दिली. त्यानुसार झाराप झिरो पॉईंट येथे तैनात असलेले ट्रॅफिक पोलीस आणि काही स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत रस्ता अडवून अखेर या पळपुट्या कंटेनरला आणि चालकाला थांबवले.

*​गुन्हा दाखल करण्याची आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सुरू*

​या अपघातामध्ये वाहनांचे आर्थिक नुकसान झाले असून काही लोकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अतिवेगाने, निष्काळजीपणे व धोकादायक रित्या वाहन चालवून अपघात करणे आणि अपघात स्थळावरून पळून जाणे याप्रकरणी चालक परमेश्वर वर्मा याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​दरम्यान, अपघात घडल्यानंतर घाटात आणि चालक थांबवला त्या ठिकाणी संतप्त लोकांकडून चालकाला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीबाबतही पोलिसांकडून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तसेच, कंटेनर चालक आणि सियाझ कार चालक या दोघांनीही मद्यप्राशन केले होते का, याची तपासणी करण्यासाठी आणि झालेल्या दुखापतींच्या अनुषंगाने त्यांची वैद्यकीय तपासणी (Medical Test) करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.