अलिबागच्या नातवाने आजीचा खून करून टाकलेले
प्रेत आंबेनळी घाटातील 100 फूट दरीतून हस्तगत
पोलादपूर (शैलेश पालकर)- अलिबाग येथील एका युवकाने स्वत:च्या सख्ख्या आजीचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रतापगड आणि महाबळेश्वर रेस्क्यू टीमनी घेतलेल्या शोधानंतर पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील 100 फूट खोल दरीतून आज्जीचे प्रेत हस्तगत करण्यात आल्याने कशेडी आणि आंबेनळी घाट ‘किल ऍण्ड थ्रो’साठी कुप्रसिध्द होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील तीनवीरा गावातील आदर्श शेडगे या 32 वर्षीय संशयित युवकाने दागिन्यांच्या हव्यासापोटी दोन दिवसांपूर्वी सारळ गावातील स्वत:च्या सुनंदा पाटील या 85 वर्षीय सख्ख्या आजीचा खून केला. या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने आजीचा मृतदेह आंबेनळी घाटातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील ‘बावली टोक’ ते ‘दाभिळटोक’ दरम्यान असलेल्या खोल दरीमध्ये फेकून दिला. अलिबाग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत संशयित युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या कडक चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह फेकलेले ठिकाण दाखवले. यानंतर अलिबाग पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
4 मे 2026 तारखेला सकाळी साडेआठच्या दरम्यान प्रतापगड सर्च ऍंड रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव यांना पोलादपूर पोलीस स्टेशनमधून फोन आला. घटनेचे गांभीर्य ओळखून महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि प्रतापगड सर्च ऍंड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ आपले साहित्य जमा केले आणि ते आंबेनळी घाटाच्या दिशेने रवाना झाले. सुरूवातीला आरोपीने मृतदेह नक्की कुठे टाकला आहे, याबाबत निश्चित ठिकाण कोणालाही माहिती नव्हते. त्यामुळे टीमने घाटामधून दरीमध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. सुमारे दीड-एक तासांच्या अथक शोधानंतर 100 फूट खोल दरीमध्ये एका काळया रंगाच्या पिशवीमध्ये मृतदेह आढळून आला.
आंबेनळी घाटातील पोलादपूर तालुक्यातील ‘बावली टोक’ ते ‘दाभिळटोक’ दरम्यानच्या धोकादायक कडेकपारी आणि खोल दरीमध्ये असलेला मृतदेह बाहेर काढणे हे आव्हानात्मक होते. प्रतापगड आणि महाबळेश्वर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आपसातील समन्वयाने लगेचच रोप आणि इतर साहित्याचा मांडणी करून दरीमध्ये उतरले सुरुवात केली. या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने अडचणी निर्माण झाल्या तरी जीवाची बाजी लावून सुमारे एक तासाच्या कठोर परीश्रमानंतर दोन्ही टीमच्या सदस्यांना आजीचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. ही मोहिम राबवताना रेस्क्यू टिमच्या सदस्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली.
या धाडसी रेस्क्यू मोहिमेमध्ये सुनीलबाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, ॠषिकेश जाधव, अजित जाधव, मुन्ना उतेकर, ओमकार सोनवणे, शरद सावंत, निखिल सावंत, आणि संकेत सावंत या दोन्ही टीमच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील मोरी बांधकामादरम्यान पाईपामध्ये एका अज्ञात महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. याखेरिज, गेल्या वर्षी प्रेयसीने प्रियकराच्या मदतीने ओढणीने गळा आवळून एका वाहनचालकाचे प्रेत टाकल्याचे कशेडी घाटातील मोरीच्या पाईपालगत आढळून आले होते. अशा अनेक घटना कशेडी आणि आंबेनळी घाटांमध्ये झाल्याने ‘किल ऍण्ड थ्रो’साठी कुप्रसिध्द होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनांतील काही गुन्ह्यांची उकल करणे पोलीसांना अशक्यप्राय असून अलिबागच्या नातवाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आल्यामुळे त्याने दिलेल्या माहितीमुळे हा गुन्हा उघडकीस आल्याचे मानले जात आहे.













