सावंतवाडीत महावितरणच्या हलगर्जीपणाविरोधात वीज कंत्राटी कामगार संघ आक्रमक

अधिकारी धारेवर : पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणार – अशोक सावंत

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
११ केव्ही विद्युत वाहिनीवर कंत्राटी कर्मचाऱ्याला चढवण्यास स्पष्ट मनाई असतानाही, एका हेल्पर दर्जाच्या कंत्राटी कामगाराला पोलवर का चढवण्यात आले? असा संतप्त सवाल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे मुख्य सल्लागार अशोक सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.

कारिवडे येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी अशोक सावंत यांनी सावंतवाडी येथील महावितरण कार्यालयावर धडक देत उपअभियंता राक्षें यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

​कारिवडे येथे महावितरणच्या पोलवर काम करत असताना प्रज्योत नाईक या कंत्राटी कर्मचाऱ्याला विजेचा तीव्र धक्का लागला होता. या दुर्घटनेत तो पोलवरून खाली कोसळला. सध्या त्याच्यावर गोवा येथील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशोक सावंत यांनी रुग्णालयात जाऊन प्रज्योत नाईक याची भेट घेत त्याला धीर दिला. यानंतर त्यांनी थेट सावंतवाडी महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

​महावितरणने चूक कबूल केली
“पोलवर कंत्राटी कर्मचाऱ्याला चढवल्यानंतर त्याची सर्व जबाबदारी महावितरणची असते. असे असतानाही दुर्घटना घडली तेव्हा महावितरणचा एकही जबाबदार कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हता,” असा आरोप अशोक सावंत यांनी केला.
या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अखेर आपली चूक कबूल केली आहे. जिल्ह्यात सध्या साडेपाचशे कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून महावितरणची सेवा देत आहेत, मात्र त्यांच्या सुरक्षिततेबाबत महावितरण गंभीर नसल्याचे या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अशा ९ घटना घडल्या असून, त्यात काही तरुण कंत्राटी मुलांचा मृत्यू झाला आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सावंत म्हणाले.

​ कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आ. दीपक केसरकर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सावंत यांनी आवर्जून सांगितले. निलेश राणे यांनी तर यापूर्वी हा मुद्दा थेट विधानभवनात उपस्थित केला होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साहित्याचे वाटप झाले असून, नुकसान भरपाईची तरतूदही करण्यात आली आहे.

या आंदोलनाप्रसंगी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, जिल्हा सचिव संजय गोवेकर, सर्वेश राऊळ, मोहन गावडे, बापू देसाई यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार
“सावंतवाडीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महावितरणने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाची सक्ती करू नये. जर तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध नसतील, तर कंत्राटी कामगारांना थेट पोलवर चढवू नये,” असा इशारा अशोक सावंत यांनी दिला. तसेच, या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी यांचे विशेष लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.