नाशिक येथील व्यंकटेश पतसंस्थेची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला भेट

अभ्यासदौऱ्यातून जाणून घेतली कार्यपद्धती; ‘चिपळूण नागरी’च्या उपक्रमांचे कौतुक

चिपळूण (प्रतिनिधी) : व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चांदवड या संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेची कार्यपद्धती समजून घेतली. सहकार क्षेत्रातील उत्तम पतसंस्था म्हणून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
चिपळूण नागरीची प्रगती, उत्तम प्रशासन, सभासद सेवा, कर्जवाटप पद्धती, ठेवी संकलन, लेखा पद्धती, वसुली व्यवस्थापन तसेच उत्कृष्ट सहकारी संस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला भेट देण्याचा निर्णय घेतला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी व्यंकटेश नागरी सहकारी संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी व्यंकटेश नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी सहकार भवनला देखिल भेट देऊन पाहणी केली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ही सहकार क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कार्य करीत आहे. त्यामुळे या संस्थेची कार्यपद्धती, व्यवस्थापन, विविध योजना, सदस्याभिमुख उपक्रम आणि प्रगतीचा प्रत्यक्ष अभ्यास आमच्या संस्थेस मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिवाराने व्यक्त केला. या अभ्यासदौऱ्यात व्यंकटेश पतसंस्थेचे अध्यक्ष दिपक व्यवहारे, जनसंपर्क संचालक डॉ.जीवन देशमुख, संचालक विजय क्षेत्रीय, रमेश जाधव, ऍड.किशोर व्यवहारे सीईओ संतोष सुतारे, सहाय्यक ओंकार सोनावणे आदी सहभागी झाले होते. त्यांचबरोबर त्यांनी वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रा. लि.पिंपळी येथे भेट दिली यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक साबळे,संचालक सोमा गुडेकर, संचालक रविंद्र भोसले, सत्यवान म्हामूणकर,तपासणी अधिकारी पांडुरंग लवेकर, अधिकारी प्रशांत वाजे, महेश खेतले, अविनाश गुडेकर, संदीप पाटील, गणेश कदम आदी उपस्थित होते.