
तीन साहित्यिकांचा कोल्हापुरात थाटात सन्मान
सावंतवाडी । प्रतिनिधी :मराठी साहित्याच्या प्रांगणात आपल्या शब्दांचा सुवास दरवळवणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या तीन ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे यांच्या वतीने शनिवार, दिनांक ६ जून रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत थाटात आणि वाङ्मयीन वातावरणात पार पडला. या पुरस्कारांमुळे सिंधुदुर्गच्या साहित्य क्षेत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाची हॅट्ट्रिक केल्याचे पाहायला मिळाले.
या सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह” पुरस्कार लाभला. मालवण शाखेच्या सदस्या सौ. उज्ज्वला धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या लेखसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह” आणि ज्येष्ठ सदस्य श्री. दत्तात्रय शिवराम (द. शि.) हिर्लेकर गुरुजी (वय ९८ वर्षे) यांच्या “कर्तव्यपूर्ती” या पुस्तकाला “सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ९८ वर्षीय हिर्लेकर गुरुजींचा हा सर्वोच्च सन्मान त्यांचे सुपुत्र शशांक हिर्लेकर यांनी स्वीकारला.
या आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या व्यासपीठावर स्वागताध्यक्ष तथा राष्ट्रपती पदक विजेते पर्यावरण तज्ज्ञ ॲड. तुषार शिवशरण, सोल्यूशन माईंडचे सुजित दातार, माजी आमदार जयश्री जाधव, कोळी नटसम्राट लोककलाकार राजेश खर्डे वेसावकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री शमा वैद्य, अभिनेत्री वैशाली राजशेखर, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेत्री चित्रा साठे आणि शंकर अंदानी आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
तितिक्षाच्या अध्यक्षा प्रिया दामले यांनी प्रास्ताविक करताना, मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला आणि ग्रंथनिर्मितीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे हाच या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. स्वागताध्यक्ष ॲड. तुषार शिवशरण यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत तितिक्षाच्या या वाङ्मयीन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. माजी आमदार जयश्री पाटील यांनीही सर्व सन्मानप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आयोजकांच्या वतीने प्रिया प्रमोद दामले आणि सुजित दातार यांनी उपस्थित मान्यवरांना शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविले.
*कवी संमेलनात ‘दीपी’ यांच्या रचनेला दाद*
पुरस्कार सोहळ्यानंतर रंगलेल्या निमंत्रित कवींच्या संमेलनात पुरस्कारविजेते कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी आपल्या बहारदार शैलीत कविता सादर केली. त्यांच्या, “डोळ्यात बापाच्या मला सुखदुःख सारे काय दिसते…. अन् पापणी लवताच माझी राबणारी माय दिसते” या संवेदनशील ओळींनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि सभागृहातून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
*सुवर्णमहोत्सवी जोडप्यांचा ‘पुनर्विवाह’ सोहळा*
या कार्यक्रमाचे दुसरे सत्र अत्यंत भावुक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरले. लग्नाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या सुवर्णमहोत्सवी जोडप्याचा शाल, मानाची टोपी, साडी आणि मुंडावळ्या बांधून, मंगलाष्टकांच्या मंजुळ स्वरात विशेष विवाह सोहळा साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांचे डोळे दिपवले.
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, सोलुशनमाईंड पुणे व श्रीद्या क्रिएशन यांनी या सोहळ्याचे संयुक्त आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या अजिता मुळीक, गौरव पुंडे आणि भालचंद्र शिर्के यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या संपूर्ण दिमाखदार सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन प्रिया दामले आणि श्री गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले. पुणे येथून येऊन कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरीत असा दैदिप्यमान आणि दर्जेदार सोहळा घडवून आणल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सिंधुदुर्गच्या तीनही साहित्यिकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












