कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ग्रामपंचायत घोणसरी, ता. कणकवली यांची जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी निवड करण्यात आली. तालुकास्तरीय समितीमार्फत झालेल्या मूल्यमापनात घोणसरी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत सर्वोत्तम ग्रामपंचायतींपैकी स्थान मिळविले होते.
यानिमित्त जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने नुकतीच घोणसरी ग्रामपंचायतीला भेट देऊन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची सविस्तर पाहणी व मूल्यमापन केले.
जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन (भा.प्र.से.) या होत्या. त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंत उगले, प्रकल्प संचालक श्रीमती माधुरी परिट, कार्यकारी अभियंता श्री. अर्जुन गोळे, दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार श्री. समीर देशपांडे, विस्तार अधिकारी श्री. संदेश आनंदराव भोंडे व श्री. रविंद्र दत्तात्रय कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सचिन बाळासो शिरवाडे, श्री. लक्ष्मण कृष्णा पाचगांव तसेच श्री. शुभम हणमंत राजूत आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत घोणसरीचे सरपंच श्री. प्रसाद दिलीप राणे, पंचायत समिती सदस्य सौ.मानसी मराठे,ग्रामपंचायत सदस्य सौ. अंकिता परब, सौ. प्राची राणे, सौ. सुप्रिया आचरेकर, श्री. सतीश जाधव, सौ. ऐश्वर्या सावंत व सौ. दीप्ती कारेकर ,सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक,समुदाय आरोग्य अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी तालुका संघटना पदाधिकारी, ग्रा.पं.कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या सुशासनयुक्त गाव, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम यांचे सविस्तर सादरीकरण ग्रामपंचायत अधिकारी श्री. सिद्धेश बापू गोसावी यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीने राबविलेल्या डिजिटल सेवा, ऑनलाइन कर वसुली, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, आपले सरकार सेवा केंद्र, पर्यावरणपूरक उपक्रम, जलसंधारणाची कामे आणि लोकसहभागातून राबविलेल्या विकासकामांची माहिती समितीसमोर मांडण्यात आली.
समिती सदस्यांनी विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेतला. घोणसरी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले असून अभियानाच्या निकषांनुसार पुढील मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
घोणसरी ग्रामपंचायतीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.











