भटक्या कुत्र्याचे डोळे फोडून पाय तोडले
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. पेठकिल्ला रोडवरील पाथरे बागेच्या बाजूला असलेल्या नाईक कंपनीसमोर एका निष्पाप भटक्या कुत्र्याचा अमानुषपणे छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत कोणत्यातरी अज्ञात नराधमाने या मुक्या प्राण्याचे दोन्ही डोळे फोडले असून, मारहाणीमुळे त्याचा एक डोळा थेट बाहेर आला होता. एवढ्यावरच न थांबता त्या अज्ञात व्यक्तीने कुत्र्याच्या डोक्याच्या वरील भागावर कोणत्यातरी टोकदार वस्तूने गंभीर प्रहार केला होता, त्याचा पाठीमागचा डावा पाय तोडला होता आणि त्याचे दोन्ही पाठीमागचे पाय एकत्र बांधून त्याला अत्यंत वेदनादायी स्थितीत तडफडत सोडून दिले होते. या धक्कादायक आणि विकृत कृत्यामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ही संपूर्ण घटना दिनांक ०६/०६/२०२६ रोजी सायंकाळी १७:३० वाजेपासून ते दिनांक ०७/०६/२०२६ रोजी सकाळी १०:०९ वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला घडली आहे. याप्रकरणी बंदररोड येथील रहिवासी फिर्यादी इशान प्रसाद खानोलकर (वय २२ वर्षे) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३५१(२), ३५२, ३(५) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१) (A) व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. एका असहाय्य प्राण्यासोबत इतकी क्रूरता दाखवणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आरोपीचा रत्नागिरी पोलीस कसून शोध घेत असून, त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींकडून केली जात आहे.










