कोकणात ठाकरे सेना कोमात ..!     

वार्तापत्र -कोकण… संतोष वायंगणकर

बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तो फार मोठा धक्का होता. अर्थात कोकणच्या राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यापूर्वीही अनेकवेळा निवडणुकीत धक्के अनुभवायला मिळाले आहेत. या धक्क्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना सावरण्याऐवजी आपलेच कसे बरोबर आहे हे सांगण्यासाठी शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत आहेतच. कोकणच्या या स्वराज्य सभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होणार घोडेबाजार निश्चितपणे टळला आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क, असणाऱ्या बहुतांशी मतदारांना चांगली संधी हुकली असेच वाटत असणार हे निश्चित…

 

 

महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थाच्या विधानपरिषद निवडणुकांचा धमाका सध्या सुरू आहे. स्वराज्य संस्थाच्या १६७ जागासाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. गेले पंधरा दिवस याच विधानपरिषद निवडणुकांची चर्चा होत आहे. निवडणुका कशा होणार? अटी-तटीच्या, तडजोडीच्या की काँटे की टक्करच्या होणार अशी चर्चा होत असताना राज्यातील १७ जागांपैकी ६ विधानपरिषद स्वराज्य संस्था मतदार संघात बिनविरोध निवडणुका झाल्या. ठाणे, पुणे, कोकण या स्वराज्यसंस्था मतदार संघाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. ठाणे विधानपरिषद मतदार संघातून सिंधुदुर्गचे सुपूत्र रविंद्र फाटक बिनविरोध निवडले गेले. तर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले.

कोकणच्या या मतदार संघात सिंधुदुर्ग-२२३, रायगड ५१८, रत्नागिरी ३२८ अशी मतदारांची संख्या होती. १९९४ साली या मतदार संघात त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुक लढविणारे माजी आमदार विजय सावंत या मतदार संघातून बिनविरोध निवडून गेले होते. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणुक रंगतदार होणार असे वाटले होते. त्याचे कारणही तसेच होते. आ.महेंद्र दळवी यांची कन्या जुईली महेंद्र दळवी यांनी या मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. जुईली महेंद्र दळवी यांनी उमेदवारी दाखल करण्यामागे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गटाचे) नेते खा. सुनिल तटकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री ना. भरत गोगावले आणि रायगडमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांचे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात विळया-भोपळयाचे असलेले नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीला रायगडमधूनच जोरदार विरोध होईल. ही अटकळ होतीच. रायगडच्या राजकारणात तटकरे-गोगावलेंसह शिवसेना आमदार यांच्यात ‘समझोता’ होणं कठीण होतं. रायगडमधलाच राजकिय संघर्ष असल्याने कोकणात निवडणुक होणारच असे वाटले होते. परंतु राजकिय समजूतदारपणा, प्रचंड संयमी स्वभाव आणि विविध राजकिय पक्षातील खा. सुनिल तटकरे यांनी जपलेले ‘मैत्रेय’ या मागच हे देखिल एक कारण होत. रायगडातील शिवसेना आमदारांना थंड करण्यात शिवसेना नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना यश आले. आपल्या नेत्यांच्या शब्दापलिकडे आपण नाही हे रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीत कोकणात बेबनाव होऊ द्यायचा नाही ही भुमिका महायुतीतील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) या महायुतीतील घटक पक्षांनी घेतल्याने सहाजिकच महायुतीमध्ये रायगड जिल्ह्यात जरी तिथल्या आमदार आणि राजकिय नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष असला तरीही तो सुप्त संघर्ष माध्यमांमध्ये आला नाही.

कोकणच्या या मतदार संघाची पहिली निवडणुक १९८८ मध्ये झाली. विजय सावंत, ठाणेचे माजी महापौर अनंत तरे, खा.सुनिल तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे त्यानंतर अनिकेत तटकरे यांनी या कोकण स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणुक लढविली आहे. ३१ मे २०२४ रोजी अनिकेत तटकरे यांची आमदारकीची मुदत संपल्याने ही निवडणुक होत होती. महायुतीकडुन रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाला) सुटला होता. या कोकण स्वराज्य संस्था मतदार संघात मतदार संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड होते. तरी देखिल महाविकास आघाडीने या निवडणुकीत उसने अवसान आणत दंड थोपटण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या चर्चेत महाविकास आघाडीच्या घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरीचे माजी आमदार आणि दोन वर्षापूर्वीच भाजपातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले बाळ माने यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली होती. गुहागरचे उबाठा सेनेचे आमदार भास्करशेठ जाधव हे माजी आमदार बाळ माने यांचे व्याही लागतात. आ.भास्कर जाधव यांचे बाळ माने यांच्याशी अत्यंत जवळचे नातेसंबंध लागत असल्याने यामध्ये आ.भास्कर जाधव यांची भुमिका काय असणार याविषयी चर्चा होती. परंतु मागील चार-पाच दिवसात कोकणच्या या मतदार संघातून अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र दळवी, शेकापचे अरविंद म्हात्रे यांनी माघार घेतली होती. यामुळे कोकणच्या या मतदार संघात महायुतीचे अनिकेत तटकरे आणि महाविकास आघाडीचे सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्यात लढत होणार. जरी ही निवडणुक एकतर्फी होणारी असली तरी निवडणुक प्रक्रिया पार पडणार असे वाटले होते. परंतु राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री ना.नितेश राणे यांनी या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भुमिका बजावली. यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि.४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे कोकणच्या या मतदार संघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्यादिवशी मोठा ‘ट्वीस्ट ’आला. रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष कै.उमेश शेटये यांच एक खास शैलीतल एक राजकिय वाक्य होतं… ‘वन टू का फोर’ त्याची आठवण रत्नागिरीकरांना निश्चितच बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर झाली असले !

बाळ माने यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तो फार मोठा धक्का होता. अर्थात कोकणच्या राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यापूर्वीही अनेकवेळा निवडणुकीत धक्के अनुभवायला मिळाले आहेत. या धक्क्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना सावरण्याऐवजी आपलेच कसे बरोबर आहे हे सांगण्यासाठी शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत आहेतच. कोकणच्या या स्वराज्य सभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होणार घोडेबाजार निश्चितपणे टळला आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क, असणाऱ्या बहुतांशी मतदारांना चांगली संधी हुकली असेच वाटत असणार हे निश्चित. या निवडणुकीत बिनविरोध निवडणुक होण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली. ती राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी. खा.सुनिल तटकरे आणि माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. २०१८ साली याच मैत्रीमुळे अनिकेत तटकरे यांना खा.नारायण राणे यांनी निवडून आणण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे. आज तब्बल आठ वर्षानंतर त्याची मैत्रीची पुनरावृत्ती ना.नितेश राणे आणि अनिकेत तटकरे यांच्या मैत्रीतला तोच धागा या निवडणुकीत दिसून आला आहे.