सह्याद्रि माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल- आ. शेखर निकम

सह्याद्रि माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन

चिपळूण (प्रतिनिधी) : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली व महाराष्ट्र कृषि विभाग, रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सह्याद्रि माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व घरडा केमिकल्सचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी यांचे हस्ते संपन्न झाले.
कोकण हा पहाडांचा प्रदेश. शेती साठी शेतकर्यांना प्रेरीत करणे व त्यांची ही आवड कायम ठेवणे ही प्राथमिक गरज लक्षात घेऊन ही माती परीक्षण प्रयोग शाळा शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आली आहे. मृदा संवर्धन, गरजेनुसार खतांचा वापर या तत्त्वावर ही प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे, त्यामुळे हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. घरडा केमिकल्स मार्फत या प्रयोगशाळेस सीएसआर फंडामधुन सहाय्य करण्यात आले तसेच रत्नागिरी जिल्हा कृषि विभाग यांचे मार्फत जिल्हा कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय कृषि अधिकारी शिवाजी शिंदे, तालुका कुषी अधिकारी शत्रुघ्न मेहत्रे , जिल्हा मृदा सर्वेक्षण व चाचणी अधिकारी डॉ. सारीका पाटील यांचे यासाठी विशेष मार्गदर्शन लाभले.
आ. शेखर निकम यांनी मनोगतामध्ये या प्रयोगशाळाचा पुरेपुर वापर करत आपल्या शेतातील मातीचे आरोग्य सुधारणे तसेच उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. घरडा केमिकल्सचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी यांनी सह्याद्रि माती परीक्षण प्रयोगशाळेच्या उपक्रमास शुभेच्छा देत घरडा केमिकल्स यासाठी कायम सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या प्रयोगशाळेच्या कार्य अहवाल सादर केला. या प्रयोगशाळेतून संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे तेरा हजार मातीचे नमुने यशस्वीरित्या तपासून संबंधित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहेत . या प्रकल्पासोबतच महाविद्यालयामधील बेकरी युनिट, अत्याधुनिक संगणक कक्ष व डिजिटल रुमचे देखील उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सह्याद्रि शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम, डॉ. इसहाक खतिब, जेष्ठ संचालक मारुती घाग, जिल्हा परिषद सदस्य पुजा निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडीक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते.