खेड (प्रतिनिधी) : शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत महाराजा प्रतिष्ठान – महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऐतिहासिक पालगड किल्ल्यावर “शिवध्वज पालगड अभियान (अभ्यास मोहीम)” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गडकिल्ल्यांचे संवर्धन, इतिहासाचे जतन आणि युवकांमध्ये स्वराज्याच्या इतिहासाविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजन व अभिषेकाने झाली. हा मान संस्थेचे अध्यक्ष अजय शेठ गोगावले आणि वनश्री ताई अजय गोगावले यांना देण्यात आला. यानंतर पालगड किल्ल्यावर शिवध्वज फडकविण्याचा सोहळा पार पडला. लोखंडी पाईपवर उभारण्यात आलेल्या शिवध्वजाचे पूजन करण्याचा मान अमर काते आणि पुनम काते यांना देण्यात आला.
शिवध्वजारोहणाचा मान नगरसेविका वैभवी ताई वैभव खेडेकर यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते पालगड किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अभ्यास मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणून इतिहास अभ्यासक व व्याख्याते शैलेश निकम यांनी पालगड किल्ल्याचा इतिहास, त्याचे सामरिक महत्त्व तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून उपस्थितांना किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाची माहिती मिळाली.
यावेळी पालगड किल्ल्यासाठी महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या सोलर स्ट्रीट लाईटचेही अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना सुविधा उपलब्ध होणार असून गडसंवर्धनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
“शिवध्वज पालगड अभियान (अभ्यास मोहीम)” या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड. अभिजीत गांधी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराजा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, सदस्य आणि शिवप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून गडकिल्ल्यांच्या जतन-संवर्धनाचा संदेश देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.










