खेड (प्रतिनिधी): कोकणातील बहुसंख्य समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणबी समाजामध्ये विवाह व अंत्यविधींशी संबंधित प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी-परंपरांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड मुंबई व खेड ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जोगळे बंधू मल्टिपर्पज हॉल येथे भव्य “कुणबी परिषद २०२६” आयोजित करण्यात आली. या परिषदेत समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत विवाह आणि मृत्यूनंतरच्या विविध खर्चिक व कालबाह्य प्रथांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव संमत करण्यात आला.
परिषदेला कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश मांडवकर, रोशन पाटील, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे यांच्यासह विविध पदाधिकारी, प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेत विवाह समारंभातील विविध रूढी, चालीरीती, परंपरा तसेच मृत्यूनंतरच्या विधींमधील सामाजिक आणि धार्मिक पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुक्त चर्चा आणि विचारमंथनातून समाजाच्या सर्वांगीण हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राज्य शासनाने २२ मे २०२२ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी समाजाने सकारात्मक भूमिका घेत तिच्या अंमलबजावणीचा निर्णयही परिषदेत घेतला. याशिवाय सामाजिक समारंभांवरील वाढता खर्च कमी करण्यासाठी विवाह समारंभात डीजे वाजवण्यास बंदी, प्री-वेडिंग कार्यक्रम टाळणे, विवाहसोहळ्यात मांसाहार व मद्य देण्यास बंदी, ओटी भरण्यासाठी साडी देण्याची प्रथा बंद करणे तसेच मंगळाष्टकावेळी तांदळाऐवजी फुलांचा वापर करण्याचे ठरविण्यात आले.
साखरपुडा समारंभ मर्यादित उपस्थितीत आणि कमी खर्चात करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे विवाह समारंभ अधिक साधेपणाने पार पडतील, अनावश्यक आर्थिक भार कमी होईल आणि समाजातील एकोपा व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी ॲड. रोशन पाटील यांनी विवाह समारंभातील विविध प्रथा, त्यांचे सामाजिक परिणाम आणि काळानुरूप आवश्यक बदल याविषयी मार्गदर्शन केले. तर विजय थोरे यांनी मृत्यूनंतरच्या विधींमधील अनावश्यक खर्च टाळून समाजहित जपण्याची गरज अधोरेखित केली.
अध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, सहदेव बेटकर आणि प्रकाश मांडवकर यांनी समाज संघटन, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि एकजुटीचे महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर बाईत होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून कृष्णा आग्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
खेड ग्रामीण शाखेचे सचिव सचिन गोवळकर यांनी परिषदेचा प्रस्ताव मांडला. मुंबई शाखेचे सचिव संदीप दोडेकर, ग्रामीण खजिनदार सुधीर वैराग, ग्रामीण युवा अध्यक्ष सुरज जोगळे आणि महिला अध्यक्षा ममता भुवड यांनी दोन्ही विषयांवर प्रभावी चर्चा घडवून आणली. समाजातील ज्येष्ठ, महिला, युवक तसेच विविध गावांतील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवत विधायक सूचना मांडल्या.
कुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई, खेड मुंबई, खेड ग्रामीण, युवा आणि महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड ग्रामीण शाखेचे सहसचिव बाळू सनगरे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत केले.










