निक्षय मित्र अभियानाचा कुणकेश्वरातून शुभारंभ; देवस्थान ट्रस्टकडून २२ लाभार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप
देवगड (प्रतिनिधी)
“मनुष्य जीवनात आजारपण हे अपरिहार्य आहे. मात्र अनेकदा आजारापेक्षा समाजात पसरलेल्या गैरसमजुती आणि भीती रुग्णाला अधिक त्रासदायक ठरतात. मनात निर्माण झालेली भीतीच अनेकदा रुग्णाला खचवते. कोरोनाच्या काळातही ‘कोरोना झाला म्हणजे रुग्ण वाचत नाही’ असा चुकीचा संदेश समाजात पसरल्याने मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती. परंतु योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, योग्य उपचार आणि सकारात्मक मानसिकता यांच्या जोरावर अनेकांनी त्या संकटावर मात केली. त्यामुळे कोणताही आजार झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येक आजारावर उपचार उपलब्ध आहेत. फक्त मन मजबूत ठेवून उपचारांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.”असे प्रतिपादन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले.
केंद्र शासनाच्या ‘निक्षय मित्र – क्षयरोगमुक्त भारत’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत
सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कुणकेश्वर येथे निक्षय मित्र अभियानाचा शुभारंभ श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, डॉ. मेहुल जाधव, वैद्यकीय अधिकारी इळये, डॉ. कपिल मेस्त्री (मिठबाव), वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक डॉ. सुहास कांबळे, डॉ. कोमल मांडवकर, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, गणेश वाळके, हेमंत वातकर, संजय वाळके तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच महेश ताम्हणकर यांनी क्षयरोगाबाबत समाजामध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, “क्षयरोग झालेल्या व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. उलट अशा रुग्णांशी सन्मानाने वागून त्यांना मानसिक आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे. क्षयरोग हा शंभर टक्के बरा होणारा आजार आहे. योग्य उपचार आणि आवश्यक काळजी घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. सध्या ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान सुरू असून त्याचा थेट लाभ गावाच्या विकासाला होणार आहे. या अभियानामुळे गावाला पुरस्कारही मिळू शकतो. अशा वेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने निक्षय मित्र अभियानात सहभागी होत क्षयरोगग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.”
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी शासनाच्या या अभियानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “निक्षय मित्र हे अभियान समाजातील विविध घटकांना क्षयरोगमुक्त भारताच्या चळवळीत सहभागी करून घेणारे आहे. यावर्षी या अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याची सुरुवात कुणकेश्वर येथून होत आहे. क्षयरोग हा गंभीर आजार असला तरी योग्य औषधोपचार, पोषणयुक्त आहार आणि वेळेवर घेतलेली काळजी यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना समाजाने आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांना मानसिक बळ देणे, उपचारासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.अनेकदा रुग्ण आजारामुळे नव्हे तर भीती आणि निराशेमुळे खचून जातात. त्यामुळे त्यांना सहकार्य आणि सन्मान मिळणे गरजेचे आहे.”
त्यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट मधून 22 क्षयरोगग्रस्त व्यक्तींना अन्य धान्य किट वाटप करण्यात आले. ट्रस्टच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तेजम यांनी करत उपस्थित त्यांचे आभार व्यक्त केले.













