जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले असून सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी युवा नेतृत्व दिनेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी राहणार आहे. तर उर्वरित चार मतदारसंघांची जबाबदारी विद्यमान तालुकाप्रमुख बबन राणे यांच्याकडेच राहील. याबाबती माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार ही जिल्हा कार्यकारणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
जाहीर केलेल्या नूतन कार्यकारणीमध्ये सावंतवाडी तालुक्यासाठी दोन तालुकाप्रमुख नेमण्यात आले असून यामध्ये बबन राणे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली असून त्यांच्यावर माजगाव, इन्सुली, बांदा आणि आरोंदा या जिल्हा परिषद मतदारसंघांची जबाबदारी तर नवनिर्वाचित तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्यावर आंबोली, कोलगाव,
माडखोल, मळेवाड आणि तळवडे अशी पाच मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील विद्यमान शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांचे काम लक्षात घेता त्यांना कायम ठेवण्यात आले आहे.
दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी गणेशप्रसाद गवस यांच्यावर पुन्हा जबाबदारी देण्यात आली असून दोडामार्ग शहर प्रमुखपदी योगेश महाले यांची निवड करण्यात आली आहे. तर
वेंगुर्ला तालुकाप्रमुखपदी विद्यमान तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांना कायम ठेवतानाच काशिनाथ नार्वेकर यांच्यावरही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. या ठिकाणी दोन तालुकाप्रमुख नेमण्यात आले. तर शहर प्रमुख म्हणून उमेश येरम यांची निवड करण्यात आली.
या संपूर्ण कार्यकारणीमध्ये सहा जणांवर उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी संपवण्यात आली आहे यामध्ये झेवियर फर्नांडिस, राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, सुनील मोरजकर, सचिन देसाई, विनायक दळवी यांची नेमणूक करण्यात आली.
कार्यकारणी जाहीर केल्यानंतर जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार कार्यकारणीमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. विद्यमान व अनुभवी पदाधिकाऱ्यांसोबतच नव्या दमाच्या नेतृत्वांनाही संधी देण्यात आली आहे. ही नवी कार्यकारणी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जोमाने काम करून शिवसेनेचा झेंडा निश्चितच उंचावतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख दिनेश गावडे, सुधा कवठणकर,अर्चित पोकळे, प्रेमानंद देसाई, सुजित कोरगावकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.













