घराची साफसफाई करताना सर्पदंश; राजापूर येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

राजापूर । प्रतिनिधी : घराच्या बाजूला असलेल्या रूमची साफसफाई करत असताना सापाने दंश केल्यामुळे एका ७० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

जयवंत विश्वनाथ नार्वेकर (वय ७० वर्षे, रा. कोंबे, आडीवरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी सकाळी जयवंत नार्वेकर हे त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या रूमची साफसफाई करत होते. यावेळी अचानक एका विषारी सापाने त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाला दंश केला. सापाने चावा घेतल्याचे समजताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे हलवले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू बी.एन.एस.एस १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.