हर्णे-आंजर्ले बायपास रस्त्यावर घडली दुर्दैवी घटना; क्रेटा कारच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

दापोली । प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास रस्त्यावरील एका हॉटेलच्या आवारात सोमवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती प्रेमू राठोड यांची मुलगी सान्वी गणपती राठोड (वय ३ वर्षे ८ दिवस) ही तेथील एका हॉटेलच्या आवारात एका झाडाखाली झोपलेली होती. त्याचवेळी बापू हिरामण पवार हे त्यांच्या ताब्यातील क्रेटा कार (एमएच-०८-एएक्स-५८८७) रिव्हर्स घेत होते. वाहन मागे घेताना त्यांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने तसेच निष्काळजीपणे वाहन चालवल्याने कार थेट सान्वीच्या अंगावर गेली. या भीषण अपघातात सान्वी गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी फिर्यादी गणपती प्रेमू राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी बापू हिरामण पवार, रा. सुतारकोंड-जालगाव, ता. दापोली यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.