मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज नाकारल्यावर भोपाळमध्ये काँग्रेसचा तीव्र निषेध; RSS गणवेश टांगून आंदोलन

 

सीईओ कार्यालयाबाहेर रात्रीभर काँग्रेसचे आंदोलन
संवैधानिक संस्थांवर दबावाचा आरोप; भाजपचा निर्णयाचा बचाव

भोपाळमध्ये राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या निर्णयाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या गेटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश टांगत आंदोलन केले. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर भाजपने हा निर्णय निवडणूक कायद्यांनुसार झाल्याचे स्पष्ट केले आहे.


प्रहार डिजिटल : भोपाळ येथे राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाच्या कुलूपबंद गेटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) गणवेश टांगून निषेध नोंदवला.

मंगळवारी रात्रीपासूनच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते CEO कार्यालयाबाहेर जमले होते. विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत रात्रभर आंदोलन सुरू ठेवले. काँग्रेसने आरोप केला की, लोकशाही व घटनात्मक प्रक्रियेचा भंग करून भाजपला राज्यसभेच्या तीनही जागा बिनविरोध मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बुधवारी सकाळी रोशनपुरा चौकात काँग्रेस नेत्यांनी सामूहिक उपोषणही केले. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव आणि अनेक आमदार सहभागी झाले होते.

प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी मध्य प्रदेशातील नागरिकांना उद्देशून खुले पत्र जारी करत हा निर्णय संवैधानिक संस्थांवरील विश्वासावर हल्ला असल्याचा आरोप केला. त्यांनी नागरिकांना संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान, काँग्रेसने हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पूर्णपणे निवडणूक कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे.