चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश संगीता धोंडीराम सकपाळ यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्ष (कोकण विभाग) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील तब्बल ३९७ नगराध्यक्षांमधून त्यांची निवड झाल्याने चिपळूण शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडण्यासाठी तसेच नगर परिषद आणि नगर पंचायतींमधील समन्वय वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाने ही नियुक्ती जाहीर केली. सामाजिक, संघटनात्मक आणि लोकाभिमुख कार्यातील त्यांच्या सक्रिय सहभागाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेश सकपाळ यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून विविध प्रशासकीय आणि विकासात्मक विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कोकण विभागातील नगरपरिषद व नगर पंचायतींसमोरील समस्या, निधी, विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्न अधिक प्रभावीपणे शासन स्तरावर मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
चौकट-
राज्यातील ३९७ नगराध्यक्षांमधून चिपळूणच्या प्रतिनिधीची या पदावर निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













