खेड : खेड तालुक्यातील आंबवली उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. ११ जून २०२६) टी.टी. (टिटॅनस) इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांची गैरसोय झाली. सकाळपासून रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे ८ ते १० रुग्णांना आवश्यक इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे उपचार न घेता परत जावे लागल्याची माहिती समोर आली.
ही बाब शिवसेना कार्यकर्ते विश्वास मोरे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याची दखल घेत धाडवे यांनी तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या माध्यमातून आंबवली उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० टी.टी. इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालयातील उपचार सेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली असून रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने अशा प्रकारच्या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सचिन धाडवे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही औषधाचा तुटवडा भविष्यात पडू देणार नसल्याचे सांगितले. तसेच गरज पडेल तेव्हा शिवसेना जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंबवली उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेला हा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.











