सांगलीत थरारक गोळीबार; स्थानिक नेत्याच्या १४ वर्षीय नातवाचा मृत्यू, परिसरात खळबळ

घरात घुसून ४ ते ५ हल्लेखोरांचा गोळीबार
व्यावसायिक वादातून हल्ल्याची शक्यता, पोलिसांची नाकाबंदी

सांगली शहरात भरवस्तीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नेत्याच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


सांगली : शहरातील भरवस्तीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. स्थानिक नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात त्यांचा १४ वर्षीय नातू वेदांत बंडगर याचा मृत्यू झाला. सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी घरात प्रवेश करताच आधी हवेत गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या अंधाधुंद गोळीबारात वेदांत बंडगर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच संजय नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच पोलिस अधीक्षक तुषार जोशी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, वेदांत बंडगर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.