कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील निरूखे सुतारवाडी येथे उघडकीस आलेल्या बेकायदेशीर हत्यार निर्मिती व दुरुस्ती कारखाना प्रकरणातील आरोपी सिद्धेश चंद्रकांत मराठे (वय २९, रा. कडावल गडकरवाडी, ता. कुडाळ) याला न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर योग्य त्या अटी-शर्तींसह मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १४९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियमातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गचे अधिकारी विल्सन झुरो डिसोजा यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री पोलिसांनी निरूखे सुतारवाडी येथील एका शेडवर छापा टाकून विनापरवाना बंदुका, बंदुकांचे सुटे भाग, तसेच बंदुका तयार करण्यासाठी व दुरुस्तीसाठी वापरले जाणारे साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त केली होती. तपासादरम्यान आरोपी सिद्धेश मराठे याच्याकडून गनपावडर, छरे आणि दोन बेकायदेशीर अग्निशस्त्रेही जप्त करण्यात आली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुख्य वकील ॲड. विनय विवेक मांडकुलकर यांनी आरोपीच्या बाजूने कायदेशीर व तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
या प्रकरणात आरोपीच्या बचावासाठी ॲड. विनय मांडकुलकर यांच्यासह ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. वृषांग जाधव आणि ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले.











