कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाला मोठा धक्का देणारा पक्षप्रवेश पार पडला. देवगड तालुक्यातील उबाठाचे उपजिल्हाप्रमुख यदुनाथ ठाकूरदेसाई तसेच प्रमुख कार्यकर्ते केवल ठाकूरदेसाई यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, प्रकाश गोगटे, भूषण पोकळे, अंकुश ठूकरूल, विनोद सुके, संदीप पुजारे, सुहास वाडेकर, शशांक तावडे, समीर तानवडे, शेखर सुतार, संजय तावडे आदी उपस्थित होते.
विजयदुर्ग भागातील राजकीय समीकरणांना वेग
विजयदुर्ग परिसरात उबाठा गटाला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी यांच्यासह तेथील तालुकाप्रमुख यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता उर्वरित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने देवगड व विजयदुर्ग भागातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संबंधित पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.












