

मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव (देवरुख ) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.
नुकत्याच गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडलेल्या विभागीय युवा महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी वादविवाद तसेच ऑन द स्पॉट पेंटिंग प्रकारामध्ये यश मिळविले असून त्यांची मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फिरीसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या सोळा विद्यार्थ्यानी यामध्ये भाग घेतला होता.
महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष कॉम्प्यूटर विभागातील भक्ती सावंत व मिहीर विलणकर यांनी इंग्रजी वादविवाद प्रकारामध्ये तिसरा क्रमांक मिळविला असून द्वितीय वर्ष कॉम्प्यूटर विभागातील विद्यार्थी सुबोध मुनीश्वर याने ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गणेश जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. श्री. रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.










