खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील मुंबई–गोवा महामार्गालगत वेरळ दर्गे परिसरात आज गुरुवार, 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल अपघात घडला. खेड येथून खोपीच्या दिशेने जात असलेल्या मोटरसायकल क्रमांक MH 08 BG 6672 वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात मोटरसायकलवर प्रवास करणारे दोघे जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली 24 तास सेवेत तत्पर असलेली श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य जी संस्था, नानिजधाम यांची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना प्राथमिक उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले. या अपघातात बापू रामचंद्र पवार (वय 50, रा. पोसरे) आणि बबन हनुमान निकम (वय 35, रा. खोपी) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.











