निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगाराचा संयुक्त उपक्रम
दापोली | प्रतिनिधी: स्वातंत्रदिन अर्थात येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून दापोली येथे स्वच्छ एसटी आणि बस स्थानक प्रकल्प निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार तर्फे संयुक्तपणे कार्यान्वीत होत आहे हा प्रकल्प दापोली आगार कार्यक्षेत्राच्या मर्यादित असुन या अंतर्गत प्रत्येक एसटी बस मध्ये एक कचरा खाणारी पिशवी बसवण्यात येत आहे. या पिशवीतच प्रवाशांनी प्रवास करताना आपल्याकडील रिकाम्या पाण्याच्या व थंडपेयाच्या बाटल्या आणि खाऊचे रॅपर्स चा कचरा टाकायचा आहे. तसेच स्थानकावर प्लास्टीक बाटल्या व प्लास्टीक रॅपर्स टाकण्यासाठी दोन स्वतंत्र पिंजरे ठेवण्यात आले आहेत. बस स्थानकावरील या पिंज-यांचा प्लास्टीक कचरा टाकण्यासाठी प्रवाशांनी वापर करायचा आहे. प्रवास करताना खाऊचे रॅपर्स आणि रिकाम्या बाटल्या खिडकीतून बाहेर अथवा गाडीत इतरत्र न टाकता एसटी मधील कचरा खाणा-या पिशवीतच टाकायचा आहे.हा सर्व जमा कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या व्यवस्थेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धन कार्यात सहकार्य करावे,असे जाहीरआवाहन निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे आणि दापोली एसटी आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांनी केले आहे.










