नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप
स्वप्निल कदम -कुडाळ:
कुडाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पांडुरंग शेठ पडते (पडतेवाडी) प्रशालेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीत तब्बल १०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून शाळेची एकूण पटसंख्या ४०० च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या शाळांपैकी एक म्हणून या प्रशालेची ओळख अधिक दृढ झाली आहे.
नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे आरती ओवाळून, पुष्पगुच्छ देऊन आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप येगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. तसेच विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक गाडगीळ, माधवी सावंत, प्राची भोक्ते, मनीषा ठाकूर, मीरा गावडे, सरिता परब, शिल्पा राणे, लक्ष्मण आगलावे, कृष्णा गावडे, विद्या चव्हाण, साक्षी सावंत, पद्मिनी बगळे, वैष्णवी केळुस्कर, वैदही गोसावी, स्नेहल दळवी, मधुरा परब यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडतेवाडी प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गाच्या चार तुकड्या असून सकाळच्या सत्रात तिसरी व चौथीचे वर्ग, तर दुपारच्या सत्रात पहिली व दुसरीचे वर्ग भरवले जातात. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम आणि सातत्यपूर्ण यशामुळे तालुकाभरातील पालकांचा या शाळेवर विशेष विश्वास आहे.
पहिल्याच दिवशी शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेली होती. विशेषतः दुपारच्या सत्रात नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता. प्रशालेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सेल्फी पॉइंट ठिकाणी फोटो काढण्यास देखील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शैक्षणिक प्रगती कायम राखण्यात यशस्वी ठरलेल्या या प्रशालेचा पीएमश्री शाळा म्हणूनही गौरव झाला असून, तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ती आकर्षणाचे केंद्र बनली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे पडतेवाडी प्रशालेचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.












