सावंतवाडी । प्रतिनिधी :किक बॉक्सिंग, कराटे आणि बॉक्सिंग या तिन्ही क्रीडा प्रकारांमध्ये विभाग, जिल्हा व राज्यस्तरावर सुवर्णपदकांची ‘हॅट्ट्रिक’ साधणाऱ्या बांदा येथील अष्टपैलू खेळाडू प्रेरणा भोसले हिचा सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले.
सकल मराठा समाजातर्फे आयोजित या भव्य गुणगौरव सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर शिवसेना आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोंसले, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक संजू परब, वेंगुर्ले सभापती शंकर घारे उपस्थित होते.
याशिवाय जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, शिवसेना तालुका प्रमुख दिनेश गावडे, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, संदीप कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग यांच्यासह मराठा समाजातील विविध मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठा समाजातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













