सावंतवाडी : शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मेन रोडवरील वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांच्या मागणीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले. वाघ पाणंद येथील ‘हॉटेल मॅंगो’ ते ‘गोल्डन बेकरी’ दरम्यानच्या नाल्यावरील स्लॅबवर गेले अनेक महिने बंदिस्त अवस्थेत उभे असलेले ५ स्टॉल नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून हटवत हा संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
नाल्यावरील स्लॅबवर हे स्टॉल विनावापर पडून असल्याने परिसरात अडथळा निर्माण होत होता. मुख्य बाजारपेठ आणि मेन रोडवर येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. ही बाब नगरसेवक देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. यांनंतर स्थानिक रहिवासी व नागरिकांच्या सोयीसाठी हे ५ स्टॉल हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आता या भागात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार असून मेन रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
या कामगिरीमुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मनोज राऊळ उपस्थित होते.












