वयाच्या ९८ व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास
सात दशकांहून अधिक काळ रंगभूमी आणि संगीत क्षेत्रावर अधिराज्य
‘कट्यार काळजात घुसली’सह अनेक गाजलेल्या नाटकांमधील संस्मरणीय भूमिका
गुरुवारी पणजी येथे अंत्यसंस्कार
पणजी : मराठी संगीत रंगभूमी, नाट्यक्षेत्र आणि शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ गायक-नट, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि मराठी संगीत नाटक परंपरेतील दिग्गज व्यक्तिमत्त्व प्रसाद सावकार यांचे बुधवारी (१७ जून) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते.
गोव्यातील पणजीजवळील टोका करंजाळे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकांच्या सुवर्णयुगातील एक तेजस्वी पर्व संपल्याची भावना कला, साहित्य आणि नाट्यक्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (१८ जून) सकाळी १०.३० वाजता पणजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सांबप्रसाद रघुवीर सावकार हे त्यांचे पूर्ण नाव होते. गोमंतकीय संगीत रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभलेल्या सावकार घराण्यात त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथे झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम गायक-नट होते. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना संगीत आणि अभिनयाचे संस्कार लाभले.
‘जिंजीहून सुटका’ या नाटकातून त्यांनी बालकलाकार म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘संशयकल्लोळ’ या लोकप्रिय संगीत नाटकात एकाच वेळी चार वेगवेगळ्या भूमिका साकारत त्यांनी अनोखा विक्रमही नोंदविला.
१९६० ते १९७२ या काळात मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘तो राजहंस एक’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमधील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.
भरदार आवाज, शास्त्रीय संगीतावरील प्रभुत्व आणि प्रभावी अभिनय यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘जय गंगे भागिरथी’, ‘सावन घन गरजे’, ‘रतिहून सुंदर’, ‘भरे मनात सुंदरा’ आणि ‘नारायणा रमारमणा’ यांसारखी त्यांनी गायलेली नाट्यपदे आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
नाट्य आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. याशिवाय बालगंधर्व सुवर्णपदक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठेचे सन्मान त्यांना प्राप्त झाले होते.
प्रसाद सावकार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीतील एक अजरामर स्वर शांत झाला असला, तरी त्यांची गाणी, नाट्यपदे आणि अभिनयाचा ठसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.









