दोडामार्ग, (प्रतिनिधी):
गोवा-कर्नाटक सीमेवर आणि दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या प्रसिद्ध ‘विर्डी धबधबा वॉटर पार्क’ येथे गुरुवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. येथे मौजमस्ती आणि पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटक मधील हुबळी-धारवाड येथील सात जणांच्या ग्रुपमधील विजय दौडमणी (वय २३ वर्ष) या युवकाचा पाण्याच्या खोल डोहात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे १४ वर्षांपूर्वी याच ठिकाणी अशीच एक दुर्घटना घडली होती
हुबळी-धारवाड येथून सात मित्रांचा एक ग्रुप चोर्ला घाटातून खाली विर्डी धबधबा परिसरात आला होता. विर्डी धबधबा हा गावापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात आहे. येथे उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे खाली विहिरीच्या आकाराचा एक मोठा आणि खोल डोह तयार झाला आहे. याच डोहामध्ये हे सर्व तरुण आंघोळीसाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने विजय दौडमणी हा खोल पाण्यात बुडाला. त्याला बुडताना पाहून सोबतच्या मित्रांना प्रचंड धक्का बसला.
नेटवर्क नसल्याने मदतीसाठी अडचणी; ग्रामस्थ व पोलिसांची धाव
धबधब्याचा परिसर दुर्गम असल्याने तिथे कोणतीही मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे घटनेची माहिती वेळेत पोहोचवण्यात अनेक अडचणी आल्या. मित्रांनी तात्काळ विर्डी गावात येऊन या घटनेची कल्पना दिली. विर्डीचे पोलीस पाटील यांनी तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची खबर दिली.
माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस अंमलदार बाबी देसाई, बाळकृष्ण गवस, अभिजीत कांबळे, मानसी गावडे, पोलीस पाटील सोनिया गवस आणि विर्डी गावातील स्थानिक तरुण व ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाकडे जाणारा रस्ता चढ-उताराचा, डोंगर-दऱ्यांचा आणि नदीपात्राचा असल्याने तिथे कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. मात्र, सध्या पाऊस नसल्याने पोलीस आणि ग्रामस्थांना चालत घटनास्थळी पोहोचणे शक्य झाले.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
विर्डी गावातील धाडसी तरुण आणि दोडामार्ग पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नाने डोहात बुडालेल्या विजयचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी पोलीस व ग्रामस्थांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
१४ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
विर्डी धबधब्यावर गोवा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, हा परिसर जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायकही ठरत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षांपूर्वी नेमकी अशीच घटना याच ठिकाणी घडली होती. त्यावेळी गावातील काही युवक येथे आंघोळीसाठी आले असताना एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. आज पुन्हा तशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि खबरदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.













