शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – सभापती सिद्धेश रावराणे

उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व शाळांचा वैभववाडी पं. स. कडून गौरव

वैभववाडी प्रतिनिधी :
केंद्र व राज्य शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राबविण्यासाठी तसेच योजनांची जनजागृती व्हावी यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी मेहनत घेतली पाहिजे. लाभार्थ्याच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या कामाची पोस्ट पावती आहे. शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती वैभववाडीच्या वतीने विविध अभियानांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती तसेच प्राथमिक शाळांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती माने, महिला व बालविकास विभागाच्या श्रीमती काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सिद्धेश रावराणे म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाच्या अभियानामध्ये तसेच विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. ग्रामपंचायतींना पंचायत समितीकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. समाजातील पारंपारिक लोककला जिवंत ठेवणे ही देखील आपली जबाबदारी आहे असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या भुईबावडा, अरुळे, करुळ, कुसूर, आचिर्णे, नाधवडे व सडूरे ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या दत्त मंदिर शाळा, वैभववाडी तसेच पीएसश्री अंतर्गत निवड झालेल्या महालक्ष्मी विद्या मंदिर, कोकिसरे, वि. मं आचिर्णे नं. 1या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व पालक प्रतिनिधींचाही विशेष सत्कार करण्यात आला.

प्रधानमंत्री आवास योजनेत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या लोरे नं. 2 ग्रामपंचायतिचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या करुळ ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर बाल स्नेही पंचायत अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुसुर ग्रामपंचायतचा व आदिशक्ती टीमचा सन्मान करण्यात आला. भजनी कलाकारांना मंजुरी आदेश वाटप तसेच वयक्तिक लाभाच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले.

ग्रामीण विकास, स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, हा या सन्मान सोहळ्यामागील उद्देश असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.