मालवणला 21 व्या शतकातील आधुनिक शहर बनवणार!

आमदार निलेश राणे यांनी मांडले शहर विकासाचे व्हिजन

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरासाठी गेल्या दीड वर्षात कोट्यावधी निधी प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. गतिमान विकासातून मालवण शहराचा कायापालट करून मालवणला २१ व्या शतकातील आदर्श असे आधुनिक शहर बनवणार, असा ठाम निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

मालवण शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी संवाद साधला. ते म्हणाले “नगरपरिषद निवडणुकीत मी मालवणवासीयांना शब्द दिला होता की मामा वरेरकर सभागृहाला आधुनिक रूप देणार, तो शब्द आज १०० टक्के पुर्ण होत आहे. मामा वरेरकर नाट्यगृह साठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. पुढील काळात आणि 3 कोटी 50 लाख निधी मिळणार आहे. तशी नोंद जीआर मध्ये आहे. तसेच दुरुस्तीसाठी 1 कोटी निधी मंजूर झाला. असा एकूण 14 कोटी 50 लाख निधी मामा वरेरकर नाट्यग्रहसाठी मिळणार आहे.
ही वास्तू आता पुढील अनेक वर्षे दिमाखात उभी राहील.
सोबतच नमो उद्यान वं रॉक गार्डन साठी प्रत्येकी एक कोटी निधी मंजूर झाला आहे.

विकासात्मक निधीबाबत बोलताना आमदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. नगरविकास खात्याकडून जेव्हा जेव्हा आम्ही मालवण आणि कुडाळच्या विकासासाठी निधी मागितला, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच आम्हाला झुकते माप दिले. आमच्या मागणीनुसार निधी दिला. याचा विशेष उल्लेख आमदार निलेश राणे यांनी केला. मालवण शहरासाठी किमान 200 कोटी तर किनारपट्टीवर बंधारे व अन्य विकास कामांसाठी सुमारे 250 कोटींची विकासकामे होत आहेत. विकासनिधी वाढत राहील असे त्यांनी सांगितले.

मालवणच्या पायाभूत सुविधांवर बोलताना आमदार राणे यांनी स्पष्ट केले की, शहरातील भुयारी गटार योजनेचे काम यापुढे गतिमान आणि दर्जेदार करून घेतले जाईल. आवश्यक ती तरतूद केली जाईल. तसेच, शहराच्या नळपाणी योजनेसाठी मंजूर झालेला ४३ कोटींचा निधीतुन दर्जेदार नळपाणी योजना उभारली जाईल.

कुडाळ एमआयडीसीच्या धर्तीवर मालवणमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधीमुक्त कचरा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी जमीन संपादन करून नवीन बायपास रस्ता तयार केला जाईल, ज्यामुळे मालवण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटेल, असे त्यांनी सांगितले. हा सर्व पैसा मालवणच्या जनतेचा आहे, त्यामुळे त्याचा एकही रुपया इकडेतिकडे जाता कामा नये, भ्रष्टाचारमुक्त आणि दर्जेदार काम यालाच सर्वाधिक प्राधान्य असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.

नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरसेवकांनी कामांचा फॉलोअप घेण्याच्या सूचना केल्या. कामांचे नियोजन करून पावसाळ्यापूर्वीची आणि पावसाळ्यानंतरची कामे वेळेत पूर्ण करा. शहरविकासाच्या दृष्टीने पुढील सहा महिन्यांचे नियोजन हवे असेही त्यांनी सांगितले.

आमदारकीचे पद हे मिरवण्यासाठी नसून जनतेची सेवा करण्यासाठी आहे आणि म्हणूनच मी १८-१८ तास काम करत,” विकास आणि जनसेवा हेच लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

बंधारे उभारणीतून किनारपट्टी सुरक्षित करणार

शेकडो कोटी निधीतून किनारपट्टी भागात बंधारे मंजूर झाले आहेत. अनेक ठिकाणी काम सुरु आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेच ते खाते असल्याने किनारपट्टीच्या विकासासाठी मोठा निधी मिळतं आहे. पुढील ५ वर्षांत शेकडो कोटी खर्च करून किनारपट्टी सुरक्षित केली जाईल. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

विकास कामातून जनतेची सेवा आणि मतदार संघाचा विकास करतं राहणार

गेल्या दहा वर्षात ज्यांनी काहीच केले नाही ते दीड वर्षात काय केले असे विचारत आहेत. मात्र विकासनिधीचे आकडे जनतेसमोर आहे. आणि शाश्वत विकासाचे जनता साक्षीदार आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेला कोणतेही उत्तर देणार नाही. विकास कामातून जनतेची सेवा आणि मतदार संघाचा विकास करतं राहणार. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.