भुईबावडा आदर्श विद्यामंदिर प्रकरणात कोकण मंडळाचा दणका; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सिंधुनगरी : प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत आपल्या पाल्याला अधिक गुण मिळवून देण्याच्या हव्यासातून घडवून आणलेल्या गैरप्रकारामुळे तब्बल २४ जणांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील आदर्श विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याला लाभ मिळवून देण्यासाठी संपूर्ण परीक्षा यंत्रणेलाच वेठीस धरण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. या प्रकरणी कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कडक भूमिका घेत तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशीत सामूहिक कॉपीचा प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी एका विद्यार्थ्याच्या पाच विषयांच्या उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार करण्यासाठी केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, स्टेशनरी पर्यवेक्षक, पर्यवेक्षक आणि रिलिव्हर पर्यवेक्षक यांचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. एका विद्यार्थ्यासाठी उभारलेले हे गैरव्यवहाराचे जाळे अखेर अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे कारण ठरले.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून संबंधित विद्यार्थ्याचे पालक तथा मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्यासह संजयकुमार खेमा आडे आणि उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहिणारी अज्ञात व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने एफआयआर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षेदरम्यान बाहेरून लिहून आणलेल्या पुरवण्या विद्यार्थ्याच्या मुख्य उत्तरपत्रिकेला जोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. काही पर्यवेक्षकांनी याला विरोध केला; मात्र मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान दोन विषयांच्या परीक्षक आणि नियामकांनी मुख्य उत्तरपत्रिका व पुरवण्यांतील हस्ताक्षरातील तफावत निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजसह सखोल चौकशी करण्यात आली.
मंडळाने संबंधित विद्यार्थ्याचा पाच विषयांचा निकाल रद्द केला आहे. तसेच परीक्षा केंद्राशी संबंधित अविनाश शामराव कांबळे, नरेंद्र रामचंद्र साबळे, नितिन सिताराम जाधव, प्रफुल्ल धोंडीराम कांबळे, सुप्रसाद सहदेव पांचाळ, प्रविण बंडोपंत पोतदार, विशाल गोविंद पाटील, मिलिंद रामराव शेंडगे, जयवंत केशव पाटील, संदीप महिपती लाड आणि संजयकुमार खेमा आडे यांचे परीक्षा मानधन जप्त करून एमईपीएसनुसार कारवाईचे आदेश दिले आहेत.
याशिवाय हस्ताक्षरातील तफावत दुर्लक्षित करणारे अरुण सदाशिव कांबळे, वैदही श्रीराम बिवलकर, स्वप्नाली विशाल शिंदे, प्रशांत मच्छिंद्र आंबवडे, रंजन माधव रेमणे, रमा हेमंत जोशी, सुप्रिया शरद गार्डी, विनोद वामन सरदेसाई, उमरफारुक बाबू मुजावर आणि सुनिल रघुनाथ केसरकर यांचेही मानधन जप्त करून संस्थांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे शिपाई अक्षय विलास मोरे यांचा कोणताही सहभाग आढळून न आल्याने त्यांना केवळ लेखी समज देण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रश्नपत्रिका बाहेर कशी पोहोचली, पुरवण्या नेमक्या कोणी लिहिल्या, त्या केंद्रात लिहिल्या की बाहेरून आणल्या, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण गैरप्रकाराचे धागेदोरे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.













