सर्व बसेस अडकून पडल्या
दोडामार्ग :सुहास देसाई
बेळगाव, गोवा आणि कोल्हापूर या तीन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मुख्य तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या तिलारी घाटात काल रात्री एक अवजड ट्रक अडकल्याची घटना घडली आहे. या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वळणावर गाडी अडकल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सद्यस्थितीला केवळ छोटी आणि दुचाकी वाहनेच या मार्गावरून जेमतेम पुढे जाऊ शकत आहेत, तर मोठ्या वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे.
तिलारी घाटातून अवजड वाहतुकीला पोलीस प्रशासनाने आधीच कायदेशीर बंदी घातली आहे. असे असतानाही, अनेक ट्रक चालक केवळ किलोमीटर कमी करण्यासाठी आणि डिझेलची बचत करण्यासाठी चोरीछुपे या धोकादायक आणि अरुंद घाटाचा मार्ग निवडतात. चालकांच्या याच बेजबाबदारपणामुळे घाटात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्याचा थेट फटका नियमित बस प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
घाटात ट्रक अडकल्याने रात्रीपासूनच सकाळीच लवकर जाणारी कोल्हापूर ते दोडामार्ग एसटी बस आणि इतर प्रवासी वाहने जागीच अडकून पडली आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
घाटात अवजड वाहनांना बंदी असतानाही ही वाहने घाटात प्रवेश कशी करतात? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या मार्गावर पोलिसांचे योग्य नियंत्रण नसल्यामुळेच ट्रक चालक नियमांचे उल्लंघन धाब्यावर बसवून हा मार्ग निवडतात, असा आरोप केला जात आहे.
सध्या पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अडकलेला ट्रक बाजूला सारून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आता केवळ बंदीचे फलक न लावता, नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.













