चिपळूण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रिगल सी.बी.एस.ई. स्कूल, कोंढे येथे एका अत्यंत दिमाखदार आणि प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात योगासन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी कोकणसुकन्या व गोल्डन गर्ल तन्वी रेडीज हिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात झाली. जागतिक विजेती तन्वी रेडीज आणि तिचे वडील शाळेच्या प्रांगणात आगमन करताच, विद्यार्थ्यांनी लेझिमचा कडकडाट आणि स्कूल बँडच्या शिस्तबद्ध वादनाने त्यांचे शाही स्वागत केले. मुख्य प्रवेशद्वारापासून ते मुख्य मंचापर्यंत तन्वीवर गुलाबाच्या पाकळ्यांची केलेली नेत्रदीपक पुष्पवृष्टी सर्वांचे आकर्षण ठरली. यानंतर मंचावरील मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवर, मुख्य अतिथी आणि पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन आणि ‘माता सरस्वती’चे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मुख्य अतिथी व सन्माननीय अतिथींचा सविस्तर परिचय रिगल पब्लिक स्कूलच्या समन्वयक (Coordinator) श्रीमती आरती देसाई यांनी करून दिला. यानंतर संपूर्ण सभागृहाने उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात दिलेल्या मानवंदनेसह, जागतिक योगविजेती सुवर्णपदक विजेती तन्वी रेडीज हिचा भव्य आणि मुख्य सत्कार संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी तन्वीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तिच्या वडिलांचाही शाळेच्या वतीने विशेष गौरव व सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमात एक अतिशय रंजक आणि ज्ञानवर्धक सत्र रंगले. रिगल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी थेट जागतिक विजेती तन्वी रेडीज हिची मंचावर थेट मुलाखत (Interview Session) घेतली. ५५ देशांच्या खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदक जिंकतानाचा अनुभव, तिचा सराव, आहार आणि जिद्द याबद्दल विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तन्वीने अत्यंत साध्या आणि प्रेरणादायी शब्दात उत्तरे दिली. यानंतर शाळेच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती सुप्रिया काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरीच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी मंचावर अतिशय कठीण आणि शिस्तबद्ध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. या लहान मुलांची लवचिकता आणि एकाग्रता पाहून उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खुद्द विश्वविजेती तन्वी देखील थक्क झाली.
आपल्या मुख्य अतिथी भाषणात बोलताना संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांनी तन्वीच्या यशाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना निरोगी व यशस्वी जीवनासाठी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले. मेहनत, अभ्यासातील सातत्य, चिकाटी, जिद्द या गुणांवर माणूस यशापर्यंत कसा पोहचतो यांचे उदाहरण म्हणजे तन्वी असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका श्रीमती मोरे यांनी उपस्थित सर्व पाहुणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या अविस्मरणीय आणि यशस्वी सोहळ्याची सांगता झाली.













