चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार रत्नागिरी एस. टी. विभागात लिपिक म्हणून गेली १४ वर्ष कार्यरत सौ मनाली महेंद्र साळवी यांना जाहीर झाला आहे.
फणसोप गावच्या साळवी यांनी पोलिस पाटील म्हणून काम पाहताना तंटामुक्त गाव पुरस्कार गावासाठी मिळवला. गेली २७ वर्षे बी ए, एल एल बी, एम एस डब्लू अभ्यासक्रम शिकतच राष्ट्रीय युवा स्वयंरोजगार विकास संस्थेकडून महिला अत्याचार प्रतिबंध, कायदेशीर सहकार्य यात योगदान दिले. आपत्ती व्यवस्थापन, कोविडकाळात जनजागृती मदत कार्य, तिवरे धरणफुटी प्रसंगी मदत कार्य यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. एस टी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदी कार्यरत आहेत. त्यांच्या विविधांगी कार्याचा गौरव शासनाकडून करण्यात आल्याबद्दल रत्नागिरी एस. टी. आणि विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.













