दापोली (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचा १३ वर्षीय युवा जिम्नॅस्ट नकुल भावेश कारेकर याने हाँगकाँग येथे पार पडलेल्या ७व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरीत सहावा क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे नकुलने दापोली तालुका, रत्नागिरी जिल्हा तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले असून त्याच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आशियातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत नकुलने आपल्या कौशल्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर त्याने सहावा क्रमांक पटकावत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी नोंदवली.
नकुलच्या या यशामुळे दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. मर्यादित सुविधांमध्येही सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जागतिक स्तरावर पोहोचता येते, हे नकुलने सिद्ध करून दाखवले आहे.
आता त्याची तयारी आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सुरू झाली असून भविष्यातही तो महाराष्ट्र आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नकुलच्या या यशामुळे दापोलीच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.












