श्री. संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडीचा स्तुत्य सामाजिक उपक्रम
गुहागर प्रतिनिधी:
श्री. संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेला मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
“एक वाडी, एक संघ” या संकल्पनेतून काही महिन्यांपूर्वी मंडळाच्या वतीने अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेतून प्राप्त झालेले उत्पन्न समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन जीवन शिक्षण शाळा, गुहागर नं. १ येथे मोफत वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत एकूण २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वह्या व शैक्षणिक साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रीडा स्पर्धा या केवळ मनोरंजन किंवा स्पर्धात्मकतेपुरत्या मर्यादित न राहता त्यातून समाजोपयोगी कार्य घडावे, हा संघाचा प्रयत्न आहे. शिक्षण हे समाजाच्या विकासाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संघाच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमासाठी चंद्रकांत झगडे, प्रशांत प्रभाकर रहाटे, स्वप्निल राऊत, ऋषिकेश रहाटे, बापू रहाटे, संतोष राऊत, राकेश राऊत, अथर्व राऊत, रोशन यादव, राजेश पवार, संजय पवार, कृष्णा रहाटे, विश्वनाथ रहाटे, अंकुर रहाटे, दीपक महाडिक, संतोष रहाटे, महेश रहाटे, विशाल पवार, योगेश वेस्वीकर, प्रदीप वेस्वीकर, शौर्य कांबळे आणि आरुष कांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच संदीप रहाटे, अरविंद रहाटे, साकेत चव्हाण, अनिकेत महाडिक, दीपक महाडिक, समीर महाडिक, दिनेश खेडेकर आणि स्पृहा मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.












