चोरीसह अन्य अनेक गंभीर गुन्हे : निपाणीत केले रवाना
सावंतवाडी:
येथील जिमखाना मैदान जवळ, सबनीस वाडा भागातील रहिवासी असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय ३८) याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सावंतवाडी पोलिसांनी पाठवलेला हा हद्दपारचा प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी मंजूर केला असून, त्यानुसार ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या सुनील उर्फ सनी पाटील याच्यावर वराह (डुकरांचे) चोरी आणि मोटरसायकल चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश परब यांनी त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत प्रांताधिकार्यांकडे सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळताच हद्दपारीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली.
सावंतवाडी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि पोलीस हवालदार लक्ष्मण काळे यांनी संशयित सुनील पाटील याला हद्दपारीचा कायदेशीर आदेश प्रत्यक्ष बजावला. आदेश बजावल्याच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्याला या तिन्ही जिल्ह्यांत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
आदेश बजावल्यानंतर सुनील पाटील हा कर्नाटक राज्यातील बेळगाव जवळील निपाणी येथे वास्तव्यास गेला आहे. सावंतवाडी पोलिसांनी त्याच्या निपाणी येथील पत्त्याची आणि वास्तव्याची सविस्तर माहिती कायदेशीर पूर्ततेसाठी स्थानिक निपाणी पोलीस ठाण्याला कळवली असून, तेथेही त्याच्यावर पोलिसांची नजर असणार आहे. या धडक कारवाईमुळे सावंतवाडी परिसरातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.













