ओरोस येथील वृद्धाला २.३८ लाखांचा गंडा घालणारा सायबर गुन्हेगार ताब्यात

थेट झारखंडमधून सावंतवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

​सावंतवाडी : गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची भीती दाखवून ओरोस येथील एका वृद्ध नागरिकाची तब्बल २ लाख ३८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला सावंतवाडी पोलिसांनी थेट झारखंडमध्ये जाऊन जेरबंद केले आहे. या धडक कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सावंतवाडी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​संबंधित वृद्ध व्यक्तीला गॅस कनेक्शन बंद पडणार असल्याचे सांगून विश्वासात घेण्यात आले होते. त्यानंतर सायबर भामट्यांनी विविध क्लृप्त्या वापरून त्यांच्याकडून २ लाख ३८ हजार ५०० रुपये हडपले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक तपासाचे मोठे आव्हान समोर असताना पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा सुगावा थेट झारखंड येथे असल्याचे निष्पन्न झाले.

​माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने झारखंडकडे रवाना झाले. अत्यंत धाडसी आणि चिकाटीच्या तपासाअंती पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.

​नागरिकांनी, विशेषतः वृद्ध व्यक्तींनी गॅस कनेक्शन, बँक खाते, केवायसी किंवा वीज बिल अपडेट करण्याच्या नावाखाली येणाऱ्या संशयास्पद फोन आणि मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुन्हेगार कितीही दूर लपला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हेच सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.