न्हावेली l प्रतिनिधी:मळगाव येथील मळगाव हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि. २१) भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेवक नितेश तेली यांच्या संकल्पनेतून फिटनेस योग अकॅडमी (सावंतवाडी) आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग गुरुकुल (गोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शकांनी निरोगी आणि तणावमुक्त जीवनासाठी योगाची आवश्यकता स्पष्ट केली. नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.
या कार्यक्रमाला मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, समाजसेवक नितेश तेली उपस्थित होते. तसेच फिटनेस योग अकॅडमीचे योग शिक्षक रामनाथ सावंत, जिल्हाध्यक्षा रसिका सावंत, चेतना शिंदे, अरुण पवार, निशा गवळी, समीर हडकर, महेश परब, दर्शना पेडणेकर, प्रगती बामणे, अनिशा घाडी, रुपाली पेडणेकर, काशीनाथ पेडणेकर आणि गोव्याच्या सद्गुरू योग गुरुकुलचे योग शिक्षक भूतनाथ बाचोळकर, दिनानाथ काळोजी व कनक काळोजी उपस्थित होते.
योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून संतुलित जीवनासाठी तो अंगीकारणे काळाची गरज आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.













