कुडाळ न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ॲड. विवेक मांडकुलकर यांच्या युक्तिवादाला यश
कुडाळ : कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चेक बाऊन्स (नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) प्रकरणातील आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून दिनांक २० जून २०२६ रोजी आरोपी मंगेश मधुकर शेलेंकर (वय ४५) व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात फिर्यादी गुरुदास जगन्नाथ पेंटर (रा. मुळदे, ता. कुडाळ) यांनी ‘हिम्ब्स हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड’ या गुंतवणूक संस्थेमध्ये रक्कम गुंतवली होती. संस्थेचे संचालक म्हणून मंगेश मधुकर शेलेंकर व इतर आरोपी कार्यरत होते. फिर्यादीने आपल्या हिशोबाप्रमाणे गुंतवलेल्या रकमेची मागणी केल्यानंतर त्यांना १ लाख ४३ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला होता.
सदर धनादेश फिर्यादी यांनी कुडाळ येथील बँकेत वटविण्यासाठी सादर केला असता, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित (बाऊन्स) होऊन परत आला. त्यानंतर कायदेशीर नोटीस बजावूनही रक्कम न मिळाल्याने फिर्यादी यांनी कुडाळ न्यायालयात क्रिमिनल किरकोळ अर्ज क्र. १०४/२०१४ अन्वये चलनक्षम लिखत कायदा (N.I. Act) कलम १३८ अंतर्गत फिर्याद दाखल केली होती.
या खटल्याची प्रदीर्घ सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली. अंतिम सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर यांनी प्रभावी कायदेशीर युक्तिवाद मांडला. तसेच सादर करण्यात आलेल्या पुराव्यांतील तांत्रिक व कायदेशीर बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून आरोपींविरुद्धचे आरोप शंकातीतपणे सिद्ध झाले नसल्याचे नमूद करत त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींच्या बाजूने ॲड. विवेक मांडकुलकर यांना ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव आणि ॲड. सुयश गवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.












