नाशिकमध्ये मात्र अपक्षाचा विजय
मुंबई : राज्यातील विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व कायम राखले आहे. निकालानुसार भाजपने सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळवत आपले प्रभुत्व सिद्ध केले, तर शिवसेनेच्या उमेदवारांनी ३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर यश मिळाले असून नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. विशेष म्हणजे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सह सहा मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत नाशिकमध्ये झाली. येथे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी ३६७ मते मिळवत विजय संपादन केला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीचे नरेंद्र दराडे यांना २४८ मते मिळाली. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सय्यद खान यांनी २८२ मते मिळवत विजय मिळविला. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत यांनी ४८३ मते मिळवत प्रतिस्पर्धी वसंतराव देशमुख यांचा ११८ मतांनी पराभव केला.
जळगावमध्ये भाजपचे नंदकुमार महाजन, सांगली-साताऱ्यात धैर्यशील कदम, नांदेडमध्ये अमर राजूरकर, भंडारा-गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीत डॉ. प्रविण पोटे, धाराशिव-लातूर-बीडमध्ये बसवराज पाटील, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात सुहास शिरसाट आणि नागपूरमध्ये डॉ. राजीव पोतदार यांनी विजय मिळवला. या निकालातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, अहमदनगर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, ठाणे-पालघर, यवतमाळ, पुणे तसेच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सहा मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले. पुण्यात विक्रम काळके (राष्ट्रवादी), ठाणे-पालघरमध्ये रवींद्र फाटक (शिवसेना), यवतमाळमध्ये दुश्यंत चतुर्वेदी (शिवसेना), अहमदनगरमध्ये प्राजक्त तनपुरे (भाजप) आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमध्ये अरुण लखानी (भाजप) यांचीही बिनविरोध निवड झाली.
एकूण निकालात भाजपने ११, शिवसेनेने ३, राष्ट्रवादी काँग्रेसने २ आणि अपक्षाने १ जागा जिंकत महायुतीचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जनप्रतिनिधींचा पाठिंबा महायुतीकडे कायम असल्याचे या निकालातून दिसून आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांसाठी हा निकाल राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.












