फणसवळे नंतर हा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यात पुन्हा अवैध वाहतुकीचे रॅकेट सक्रिय आल्याचा संशय
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे कोणते पाऊल उचलतात याकडे जनतेचे लक्ष
राजापूर | प्रतिनिधी:
राजापूर तालुक्यात गोवंश जनावरांची कत्तलीसाठी अमानुष पद्धतीने वाहतूक करणारा टेम्पो रविवारी (२१ जूनच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास ओणी-पाचल मार्गावरील पांगरी खुर्द गावाजवळ पकडण्यात आला. यामध्ये कत्तलीसाठी नेणारी गोवंश जनावरे आढळून आली असून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फणसवळे येथे सापडलेले गोवंशाचे अवशेष आणि हा पकडलेला टेम्पो पाहता रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा गोवंशाच्या अवैध वाहतुकीचे प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यावर कोणती कडक भूमिका गेटात याकडे नागरिकाचे लक्ष लागून राहिले आहे.
राजापूर पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (२१ जून) पहाटे साडेतीनच्या सुमारास ओणी-पाचल मार्गावरील पांगरी खुर्द गावाजवळील रिंगरोड परिसरात संशयास्पद टेम्पोची तपासणी करण्यात आली. महिंद्रा कंपनीचा व्हिरो 1.5 XXL मॉडेलचा (एमएच-०९ जीजे-५२८२) हा टेम्पो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये पाच गोवंश जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून नेली जात असल्याचे आढळले. या जनावरांच्या वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नव्हती. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आवश्यक वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नव्हती.
तपासादरम्यान जनावरांना पाणी न देता, त्यांच्या हालचालींवर पूर्ण बंधने येतील अशा प्रकारे दोऱ्यांनी बांधून, टेम्पोच्या हौदात अक्षरशः कोंबण्यात आल्याचे समोर आले. जनावरांना उभे राहण्यासाठी किंवा हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यांच्या चाऱ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाहतुकीदरम्यान जनावरांना वेदना व यातना होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. प्राथमिक तपासात ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजेंद्र शंकर कदम (रा. हिरवडे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर), प्रवीण आनंदा खोत (रा. केकतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अल्पाईश नूरमहमद कलोट, अफान नूरमहमद कलोट (दोघेही रा. सोंडळ, ता. राजापूर) तसेच तबरेज चांदमियाँ ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांच्या वाहतूक नियम १९७८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो, सहा गोवंश जनावरे तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या अवैध वाहतुकीमागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, राजापूरातील या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तलीसाठी जनावरे नेण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारीच रत्नागिरी शहरानजीक फणसवळे या गवाशेजरच्या कातळावर अमानुष कत्तल करून गोवंशाचे अवशेष टाकल्याचे दिसून आले होते. त्याचवेळी ही घटना उघडकीस आल्याने हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारावर नियंत्रण आणण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले असताना हे प्रकार पुन्हा पुन्हा घडत आल्याने आता पोलीस अधीक्षक यासाठी कोणती पावले उचलतात आणि कोणते अभियान राबवतात याकडे हिंदू जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.












