कणकवलीत जोरदार सरी, काही ठिकाणी झाडे व फांद्यांची पडझड
कणकवली : दीर्घ प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून सोमवारी सकाळी ११ वा. पासून कणकवलीसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्याच्या झोतांमुळे काही भागांत झाडे तसेच झाडांच्या फांद्यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. कणकवली शहरातील मातोश्री मंगल कार्यालयानजीक आंब्याच्या झाडाची फांदी मोडून पडली होती. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वाऱ्याच्या वेगामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीवर किरकोळ परिणाम झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा होती. हवामान विभागाने पुढील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना जोरदार वाऱ्याच्या वेळी झाडांखाली थांबणे टाळण्याचे तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीच्या कामांना वेग येताना पाहायला मिळत.












