पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे “ज्ञानसंपदा पुस्तक बँकेचे” अनावरण; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम!

​दोडामार्ग प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, जि. प. केंद्रशाळा दोडामार्ग क्र. १ येथील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारलेल्या “ज्ञानसंपदा पुस्तक बँकेचे” अनावरण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

​या अनावरण सोहळ्याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, नगरपंचायत शिक्षण सभापती संजना म्हावलणकर, जिल्हा सरचिटणीस भैया पांगम, नगरसेविका संध्या प्रसादी, दिक्षा महालकर यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​
​शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही पुस्तक बँक सुरू केली आहे. या बँकेतील पुस्तकांची नोंदणी करणे, त्यांचे वर्गीकरण करणे आणि संपूर्ण व्यवस्थापन पाहण्याचा संकल्प स्वतः विद्यार्थ्यांनी केला आहे. “विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी” या ध्येयाने प्रेरित होऊन सुरू झालेला हा उपक्रम इतर शाळांसाठीही आदर्श ठरणार आहे.
​
या पुस्तक बँकेसाठी विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांकडून नवीन तसेच चांगल्या स्थितीतील जुनी पुस्तके भेट स्वरूपात स्वीकारण्यात येत आहेत.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके वाचनासाठी सहज उपलब्ध व्हावीत हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

​विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे.
​पुस्तकांचे वर्गीकरण आणि सांभाळ विद्यार्थी स्वतः करणार असल्याने त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होईल.

​मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
​कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेचे विशेष कौतुक केले. आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त असा रचनात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.