खेड, प्रतिनिधी : रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचा माजी विद्यार्थी तथा भारतीय हवाई दलातील फ्लाईंग ऑफिसर निसर्ग सुर्वे यांनी बुधवारी (२४ जून) इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना NDA प्रवेश परीक्षा आणि संरक्षण दलातील करिअरविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेबाबत उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते फ्लाईंग ऑफिसर निसर्ग सुर्वे यांचा पुष्पगुच्छ, पुस्तक आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या समुपदेशक शिक्षिका भक्ती करंबळेकर यांनी निसर्ग सुर्वे यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूलमध्ये पूर्ण केले असून दहावी आणि बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. शालेय जीवनातच त्यांनी NDA परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यानंतर जेएनयूमधून बी.टेक. पदवी पूर्ण करताना त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. १४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबाद येथील हवाई दल अकादमीतून त्यांची फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली.
मार्गदर्शन करताना निसर्ग सुर्वे यांनी NDA परीक्षेची तयारी, आवश्यक अभ्यास पद्धती, शारीरिक तंदुरुस्ती आणि मुलाखतीची तयारी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. संरक्षण दलातील सेवा ही केवळ नोकरी नसून ती एक जीवनशैली असल्याचे सांगत त्यांनी देशसेवेतील त्याग, शिस्त आणि समाधान यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षण काळातील अनुभव सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर व देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक भक्ती करंबळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास गावडे यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, पदाधिकारी, मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मार्गदर्शन शिबिराचे स्वागत करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.












